मुंबई, ता. १५ जून २०२४
राज्यात हिंदु मुस्लिम असा कोणताही भेदभाव नाही. सर्वच जाती धर्माच्या लोकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे शिवसेना पक्ष प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीवरुन होत असलेल्या टीकेला डॉ. राजू वाघमारे यांनी आज सडेतोड उत्तर दिले.
यावेळी डॉ. वाघमारे म्हणाले की, आमची शिवसेना ही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी आहे. याच शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील देशप्रेमी मुस्लिमांना आपलसे केले होते. युती सरकारच्या काळात साबीरभाई शेख हे मुस्लिम आमदार मंत्री देखील होते. त्यामुळे बाळासाहेबांनी कधी हिंदु-मुस्लिम असा कधी दुजाभाव केला नाही, असे डॉ. राजू वाघमारे यांनी स्पष्ट केले. देशप्रेमी मुस्लिमांना त्यांनी नेहमीच बरोबर घेतले होते.
देशातील सगळेच मुस्लिम बांधव वाईट आहेत, असा विचार बाळासाहेबांचा कधीच नव्हता. त्याच वृत्तीने बाळासाहेब वागले. त्यांचेच विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून पुढे नेत आहेत, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. महाराष्ट्रात सगळ्याच जाती धर्माचे लोक राहत असून त्यांना घेऊन पुढे जायचे आहे, असा विचार मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मांडला आहे. यातून वक्फ बोर्डाला निधा मंजूर करण्यात आल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.
अल्पसंख्यांक समाज महायुतीसोबत
विधानसभेचे मतदान हे लोकसभेच्या धर्तीवर होत नाही तर स्थानिक पातळीवरील राजकारण आणि विकासकामांवर होते. कोणी किती मतदार संघाचा विकास केला, लोकांना किती मदत केली, यावरुन मतदार मतदान करत असतो, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. लोकसभेत अल्पसंख्यांकांनी एका वेगळ्या भूमिकेतून महाविकास आघाडीला मतदान केले. मात्र अनेक मतदार संघात अल्पसंख्यांकांनी महायुतीसोबत आहोत आणि विधानसभेला नक्कीच मदत करु असे सांगितले. त्यामुळे अल्पसंख्यांक समाज महायुतीसोबत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे, असे डॉ. वाघमारे यांनी स्पष्ट केले.