केतन खेडेकर
देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम केले जात आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई असून महाविकास आघाडीचे राज्यात व देशात इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे. वर्षाताई गायकवाड या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत ते कुठूनही लढू शकतात, वर्षा गायकवाड यांना माझे मत मिळणार आहे, पंजाच्या हातात मशाल आहे व त्यानंतर तुतारी वाजवणार असे म्हणत वर्षाताई गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, मातोश्री व ठाकरे यांच्याशी पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहेत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम केले असून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतली. मुंबईतील महाविकास आघाडीच्या सहाही जागांवर विजय मिळवू असा विश्वास असून २००४ च्या लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होईल, असेही वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.