केतन खेडेकर
शॉरमा खाऊन गोरेगावमधील सॅटॅलाईट गार्डन सोसायटीच्या परिसरात अनेक मुलांना विषबाधा झाली असून त्यातील एकाचा मृत्यूही झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गोरेगावमधील भाजपाच्या स्थानिक माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओद्वारे सातम यांनी गोरेगावसह संपूर्ण मुंबईतील शॉरमा विक्रेत्यांव कारवाई करण्याची मागणी केली आहे. या शॉरमा विक्रेत्यांवर धोरणात्मक कारवाई तातडीने करण्यात यावी आणि अन्यथा याविरोधात जनतेसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल आणि त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.
जोगेश्वरी,गोरेगाव येथील भाजपाच्या माजी नगरसेविका यांनी सामाजिक माध्यमावर आपला एक व्हिडीओ प्रसारीत केला आहे. त्या व्हिडीओमध्ये सातम यांनी शॉरमा खाऊन मुलांना झालेल्या विषबाधेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. शॉरमा खाऊन मुलांना झालेल्या विषबाधा झाल्याने ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत या मुलांच्या विषबाधेला जबाबदार का असा सवाल केला आहे? या घटनेला मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार आहे असा सवाल करत सातम यांनी वेळीच या अनधिकृत खाद्य स्टॉलवर कारवाई केली असती तर असे प्रकार घडले नसते असे म्हटले आहे.
निदान आता तरी तरुणांचे आरोग्य बिघडणारे या शोरमा स्टॉलवर मुंबई महानगरपालिका कारवाई करणार आहे का? की या विक्रेत्यांना अभय देणार आहात असा सवाल करत सातम यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन गोरेगाव सह मुंबईतील शोरमा विक्रेतांना वरती तातडीने कारवाई करावी , अशी विनंती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केली आहे.
तसेच या शॉरमा विक्रेत्यांवर महापालिकेने तातडीने कारवाई न केल्यास आणि हे जर पुन्हा असेच सुरू राहिल्यास तर स्थानिक जनतेच्या मागणीचा विचार करता आपण तीव्र आंदोलन पुकारु आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल,असाही इशारा सातम यांनी दिला आहे.