लोकसभा निवडणुकांचं मतदान संपलं, तरी निकालाला अद्याप दहा दिवसांचा अवधी बाकी आहे. मात्र या काळातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटातील दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं निधन झालं आहे. कर्करोगाची लागण झाल्यानंतर सकपाळांवर गेल्या काही काळापासून उपचार सुरु होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली.
शनिवारी पहाटे सकाळी मुंबईतील लीलावती हॅास्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव सध्या लीलावती हॅास्पिटलमध्ये आहे. संध्याकाळी गिरगावातील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
कट्टर शिवसेना निष्ठावंत म्हणून ओळख असलेले पांडुरंग सकपाळ शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या अगदी जवळचे मानले जात होते. ते दीर्घकाळ दक्षिण मुंबई विभागप्रमुख होते.त्यांनी विभागप्रमुख म्हणुन आपल्या कार्याची चांगलीच छाप नागरिकांमध्ये उमटवली होती.मात्र गेल्या वर्षी अचानक फेरबदल करुन सकपाळांची उचलबांगडी झाल्याने अंतर्गत गटबाजीचीही चर्चा रंगली होती. महाविकास आघाडीचे दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी पांडुरंग सकपाळांनी मोठी मेहनत घेतली होती. सकपाळांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन ठाकरे गटाच्या सर्व सभांचे लाईव्ह प्रक्षेपणही वेळोवेळी केले जात होते. दोनच दिवसांपूर्वी बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली होती. मात्र दुर्दैवाने ती अखेरची ठरली. निकाल पाहण्याआधीच त्यांनी डोळे मिटल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.