मुंबई दि.९ : तुटता,तुटता वाचलो,हा गोविंदराव मोहीते यांच्या बोलण्यातील सच्चाइपणा आणि प्रामाणिकपणा दिसून आला असून,तोच खरा आजच्या कामगार चळवळीचा मूलाधार आहे,असे गौरवोदगार काढत खासदार अरविंद सावंत यांनी येथे केंद्र सरकारच्या कामगारद्वेशी भूमिकेचा खरपूस समाचार घेतला आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय संघ आणि महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचा काल परेलच्या महात्मा महात्मा गांधी सभागृहात अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने पाहुण्यांच्या हस्ते शाल,श्रीफळ मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शिवसेने चे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर होते
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले,केंद्रातील सरकार एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर वेळकाढूपणा करणारे पक्के खोटारडे सरकार होते,असे सांगून खासदार अरविंद सावंत म्हणाले, गिरणी कामगारांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावरही केंद्र सरकारने राजकारण केले होते.बंद एनटीसी मिलच्या कामगाराना रा.मि.म.संघाने न्यायालयात जाऊन पूर्ण पगाराचा हक्क मिळवून दिला.परंतु तो हक्क सरकारने द्यावा यासाठी मी आणि अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांनी बैठका घेतल्या.पण वस्त्रोद्योगमंत्री पियूष गोयल यांनी टोलवाटोलवी करण्या पलीकडे काहीच केले नाही.पण लोकसभा निवडणूकीपूर्वी एनटीसी मिल कामगारांना हा उर्वरित पगार देऊन, निवडणुकीत निवडून येण्याचा मार्ग मोकळा करुन घेतला. उध्दव ठाकरे सरकारने ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या घराला मालमत्ताकर माफ करण्याचा निर्णय घेतला,पण तो दडपण्याचा सरकारने प्रयत्न केला होता.मुंबईतील माणूस इथून हटता कामा नये,ही आमची भूमिका होती, असेही खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, गोविंदराव मोहिते यांनी केवळ अनुभव आणि सामंजस्याच्या मार्गाने अनेक जटील प्रश्नाची तड लावली.काही झाले तरी कामगार वर्गाशी असलेली आपली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही.म्हणूनच त्यांचे जीवनकार्य नव्या पिढीचा आदर्श ठरले आहे.खटाव मिल बंद पडू नये यासाठी त्यांनी घेतल्या प्रयत्नांची माहिती देऊन, संघटनेचे नेतृत्व करताना आमच्यात कधीच मतभेद झाले नाहीत, असेही सचिनभाऊ अहिर यांनी आवर्जून सांगितले.
या प्रसंगी प्रास्ताविक खजिनदार निवृत्ती देसाई यांनी केले.त्याच प्रमाणे माजी नगरपाल डॉ.जग्गनाथ हेगडे, कामगार नेते विवेक मोन्टेरो,मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक वाबळे,महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम, केंद्रीय श्रम व रोजगार शिक्षण केंद्राचे निवृत्त प्रादेशिक संचालक प्रदीप मून,महाराष्ट्र गिरणी कामगार संघाचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे, सहकारी चळवळीतील मारूती शिंत्रे,कोकण वैशसमाजचे संदीप गांधी, कुर्ला माजी शिवसेना नगर सेवक श्री कचरे आदींनी गोविंदराव मोहिते यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश झोत टाकणारी भाषणे झाली.
गोविंदराव मोहिते आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले, आपल्यावर दोन वेळा मृत्यूचे संकट आले.पण येणाऱ्या संकटाला घाबरण्या पेक्षा प्रत्यक्ष सामना करण्यात आपण धन्य मानले आहे. कोणत्याही गोष्टीवर मात करण्यास खेळांना अधिक महत्त्व दिले पाहिजे असे सांगून विक्रोळी येथील उत्कर्ष व्यायाम शाळा आणि मुंबईतील आयडीयल स्पोर्ट क्लब या दोन्ही संस्था जीवनात क्रीडा विषयक कलाटणी देण्यास महत्वपूर्ण ठरल्या आहेत, असे सांगून असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता मिळावी यासाठी पाहिजे आपण प्रयत्न करणार असे सांगून, उद्योग जगला तर कायमगार जगेल,हे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांचे तत्व डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत,असा संकल्प गोविंदराव मोहिते यांनी शेवटी जाहीर केला.
या प्रसंगी संघटनेचे भूतपूर्व अध्यक्ष माजी मंत्री पी.के.बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती जागविण्यात आल्या.
संघाचे पदाधिकारी सर्वश्री आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,राजन भाई लाड,सूनिल,(लालीभाऊ)अहिर,सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे,उत्तम गिते, तसेच अनेक कंपन्याचे व्यवस्थापक आवर्जून उपस्थित होते.या सोहळ्यात खासदार अरविंद सावंत यांनी विजयाची हॅटट्रिक केली आणि सर्वच प्रसंगाना धैर्याने सामोरे गेले म्हणून त्यांचा अध्यक्ष सचिन भाऊ यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.