मुंबई, दि. १३ जून २०२४
भारतीय जनता पक्षाचे सरकार अदानीवर मेहरबान असून अदानीसाठीच सत्ता राबवली जात असल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली सरकारने सर्व नियम, कायदे, अटी ह्या अदानीचा फायदा पाहूनच बनवले आहेत. भाजपा सरकारने आता धारावी प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची २१ एकर जागा अदानीच्या घशात घालण्याचे सरकारी फर्मान काढले आहे. कोणतीही टेंडर प्रक्रीया न राबवता कोट्यवधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा नाममात्र दराने अदानीला बहाल केली असून हा एक महाघोटाळा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची भूमिका भाजपा सरकारने घेतलेली आहे. जी जमीन सरकारी आहे, ती जमीन अदानीची असा प्रकार सुरु आहे. भाजपा सरकारने अदानीसाठी धारावी टेंडर आणि टीडीआर महाघोटाळा केला आणि धारावीकरांचा हक्क मारण्याचा कट रचला. नंतर धारावी पुनर्वसनाच्या नावाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी व पूर्वी जकात नाक्यासाठी असलेली मुलुंड येथील महापालिकेची जागा आणि डम्पिंग ग्राउंडची जागा लुबाडण्याचा डाव मांडला. आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणारी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा यांना गिळून टाकायची आहे. कोणालाही विश्वासात न घेता, कुठलीही जनसुनावणी न करता हा हिरवळीचा भूखंड अदानीच्या घशात घातला जात आहे. परंतु धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीला नाममात्र दराने हा भूखंड भेट देण्याचा डाव हाणून पाडू असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
मदर डेअरीने पूर्वी वापरलेल्या कुर्लाच्या भूखंडावर ८०० ते ९०० मौल्यवान झाडे आहेत, ज्यांच्यामुळे इथला परिसर हा पर्यावरणपूरक आणि संवेदनशील आहे. पण या झाडांची निर्दयीपणे कत्तल करून या इको-सेन्सिटिव्ह भूखंडच्या मुद्रीकरणाचे मनसुबे महाभ्रष्टयुती सरकारचे आहेत. यापूर्वी भाजपच्याच एका उच्चपदस्थ नेत्याचा डोळा या भूखंडावर पडला होता आणि या जागी औद्योगिक संकुल उभारण्याचा खेळ मांडला होता. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परम मित्र अदानीची नजर या भूखंडावर पडली आहे. एकनाथ शिंदेंच्या पूर्वीच्या आदेशांना केराची टोपली दाखवत महसूल व दुग्धविकास विभागाने ही जागा अदानीच्या DRPPL ला भेट देण्याचा GR काढला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून एकाही धारावीकराला विस्थापित होऊ देणार नाही, प्रत्येक धारावीकराचे पुनवर्सन धारावीतच झाले पाहिजे. पात्र-अपात्र आम्ही मानत नाही अशी आमची भूमिका आहे.
भाजपाला पर्यावरणाशी, लोकांच्या हक्कांशी काही देणेघेणे नाही, या सगळ्यांचा डोळा भूखंडावरील श्रीखंड खाण्यावर आहे. पण आम्ही तसे हाऊ देणार नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व इथल्या रहिवाशांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी इथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता हा संपूर्ण भूखंड सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित करण्यात यावा यासाठी स्थानिकांनी एक लोकचळवळ निर्माण केली आहे. या मागणीला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असेही प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
सुरेशचंद्र राजहंस
कांग्रेस प्रवक्ता आणि मिडिया समन्वयक, मुंबई काँग्रेस.