.
मुंबई / रमेश औताडे
आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळावी म्हणून विधानसभेत आदेश झाल्यानंतरही सिडको प्रशासन मनमानी कारभार करत असून सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे पुनर्वसित गावातील ग्रामस्थांनी आझाद मैदानात साखळी उपोषण करण्याचा इशारा सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
नवीन शेवा ग्रामपंचायतने अनेक वेळा जे.एन.पी.टी., सिडको, जिल्हाधिकारी रायगड व तहसिलदार उरण यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा आजपर्यंत आम्हाला जागेचा ताबा मिळालेला नाही. माजी आमदार मनोहर भोईर यांनी विधान भवनामध्ये हा विषय घेतला होता. त्या वेळेस जमिनीचा ताबा देण्यात यावा असा आदेश असताना सिडकोने त्या आदेशाचा पालन केलेले नाही अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
पुनर्वसित नवीन शेवा गावाचा पुनर्वसन १९८७ साली बोकडविरा येथील सर्व्हे नं. ११२ मध्ये एकुण क्षेत्रफळ ३३.६४ हेक्टर जमिनीमध्ये झालेला असताना. सिडकोकडून फक्त १०.५० हेक्टर मध्ये नवीन शेवा गावाचा पुनर्वसन करण्यात आलेला आहे. तसेच उर्वरित जागा सिडकोच्या ताब्यात असून ती जागा ग्रामस्थांना मिळावी म्हणून अनेकवेळा मोर्चा, आंदोलन, उपोषणे केलेली आहेत. परंतु कित्येकवेळा ग्रामस्थांना आश्वासनांची खैरात देऊन पुनर्वसित नवीन शेवा ग्रामस्थांची फसवून केलेली आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
त्यामुळे गेल्या ३७ वर्षात नवीन शेवा ग्रामस्थांना राहण्यासाठी पुरेशी जागा होत नसल्यामुळे एकत्रित कुटुंबांना राहणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षे वाट बघून सुद्धा शासन आमच्या कडे लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही नवीन शेवा ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ व गावाचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी ९ जुलै रोजी आझाद मैदान येथे साखळी उपोषण करणार आहोत.