मुंबई प्रतिनिधी
जातीयवादी वक्तव्य करणारे भाजपानेते अनुराग ठाकूर यांच्या निषेधाच्या घोषणा मुंबईत दुमदुमल्या. विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या विरोधात जातीय वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांच्याविरोधात मुंबई कॉंग्रेस तर्फे तीव्र आंदोलन केलं. अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला काळं फासण्यात आलं.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून मुंबई कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जातीयवादी अनुराग ठाकूर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं. भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी भर संसदेत जातीयवादी टिप्पणी करत राहुल गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या सूचनेनुसार कॉंग्रेस कार्यालय प्रांगणात हे आंदोलन करण्यात आलं. असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अनुराग ठाकूर यांच्या या जातीयटिप्पणीला खुद्द पंतप्रधानांनी ट्वीट केलं ही संतापजनक गोष्ट आहे. नरेंद्र मोदींच्या या जातीय मानसिकतेचाही आम्ही निषेध करतो. ही जातीयवादी भूमिका अशीच सुरू राहिली तर लोक चौकाचौकात ठाकूरचे पुतळे जाळतील असा इशारा मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी दिला. मुंबई कॉंग्रेसचे खजिनदार संदीप शुक्ला, मागासवर्गीय विभागाचे मुंबई अध्यक्ष कचरू यादव यांच्या नेतृत्वाखाली ही संताप निदर्शनं करण्यात आली.